हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. अमित शाह यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'त्यांचे हवाई दल' पाठवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याचं म्हटलं होतं. त्यावर 'मागील पाच वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी 'मोदींची सेना, मोदींचे हवाई दल, मोदींचा अणुबॉम्ब… पाच वर्षात जे काही देशाचे होते ते मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?' असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डललाही टॅग केले आहे. अमित शाह यांनी बंगालमधील एका सभेत राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बोलत असताना एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकवरून मोदी सरकारची स्तुती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हवाई दलाला आदेश देत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असं म्हटलं होतं. शाह यांच्या या वक्तव्यावरून ओवेसी यांनी त्यांचा समाचार घेतला.
जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी
जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा आहे. मोदींना भारताचा इतिहास जमावाकडून झालेल्या हत्यांसाठी लक्षात ठेवेल, अशा शब्दांमध्ये ओवेसींनी काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका केली होती. मोदींच्या कार्यकाळात देशात जमावाकडून सर्वाधिक हत्या झाल्याचं ओवेसी म्हणाले होते. गोमांस विक्री, गोमांस वाहतूक यावरुन तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवरुन ओवेसींनी मोदींवर शरसंधान साधलं. 'या घटना मोदींना कायम घाबरवतील. कारण पंतप्रधान असूनही त्यांना या घटना रोखता आल्या नाहीत,' असं ओवेसी म्हणाले होते. आसाममध्ये रविवारी (7 एप्रिल) एका मुस्लिम व्यक्तीला जमावानं मारहाण करण्यात करुन त्याला जबरदस्तीनं गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आलं. ओवेसींनी या घटनेचा निषेध केला. 'ज्या राज्यात गोमांसावर बंदी नाही, जिथले लोक गोमांस खातात, तिथे शौकत अली नावाच्या एका 68 वर्षीय बेदम मारहाण केली जाते. त्याला जबरदस्तीनं गोमांस खायला लावलं जातं. यापेक्षा वाईट काय असू शकतं?', असं ओवेसी म्हणाले होते.
'जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त, मोदी टी-शर्ट विक्रीत व्यस्त; वाह! क्या चौकीदार है''जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत आणि इकडे नमो अॅपवर टी शर्टची विक्री करण्यात येत आहे. वाह क्या चौकीदार है!' असा टोला ओवेसी यांनी मोदींना लगावला होता. तसेच नमो अॅपवरून टी-शर्टची विक्री होत असल्यामुळे त्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. 'जेट एअरवेज बुडत आहे आणि इकडे चौकीदार एसबीआयचे 1500 कोटी रूपये देत आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली हजारो कारखाने बंद पडले आहेत. तुम्ही या छोट्या उद्योगांना कर्ज देऊ शकत नाही का?' असा सवाल ओवेसी यांनी केला होता.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसींनी पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल मोदींना विचारला होता. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली होती.पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली होती.