आसाममध्ये काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठा घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. मतदार यादीमध्ये फक्त 90 मतदारांची नोंद असताना तब्बल 171 मतं पडल्याची घटना आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोठी गडबड झाली आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदान केंद्रावर फक्त 90 मतदार आहेत. मात्र मतदानाच्या दिवशी 171 मतं पडली आहेत. हाफलोंग विधानसभेअंतर्गत हे मतदान केंद्र येतं. मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याची घटना समोर येताच पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचाने निवडणूक आयोगाची मतदार यादी खरी असल्याचं म्हणण्यास नकार दिला आहे. त्याने आपली एक यादी समोर आणली आहे. त्यानुसारच गावातील लोकांनी मतदान केल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून मतदान केंद्रावरील सुरक्षेचा देखील तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित केले होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आयोगाला सुनावलं होतं.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?" असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला होता. प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली.