तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 09:04 AM2021-02-28T09:04:23+5:302021-02-28T09:07:27+5:30
assam assembly election 2021: आणखी एका मित्रपक्षानं सोडली भाजपची साथ; निवडणुकीपूर्वी धरला काँग्रेसचा हात
नवी दिल्ली: शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आणखी एका पक्षानं भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) आणखी एक पक्ष कमी झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या मित्रपक्षांची संख्या कमी होत आहे. त्यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आसाममधील मित्रपक्षानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपपासून दूर जात थेट काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. (BJP Ally BPF Joins Congress Alliance Before Polls)
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान होईल. आसाममधील विधानसभा निवडणुकीचं (Assam Assembly Election 2021) वेळापत्रक जाहीर होताच सत्ताधारी भाजपला धक्का बसला. गेल्या ५ वर्षांपासून भाजपसोबत सत्तेत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटनं (BPF) काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीशी हातमिळवणी केली. बीपीएफनं भाजपची साथ सोडल्याचा फटका सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत बसू शकतो.
पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार
बोडोलँड पट्ट्यात बोडोलँड पीपल्स फ्रंटचं प्राबल्य आहे. २००६ पासून हा पक्ष या पट्ट्यातल्या १२ पैकी १२ जागा जिंकत आला आहे. याच पक्षानं आता काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'शांतता, एकता आणि विकासासाठी काम करण्यासाठी बीपीएफनं आगामी विधानसभा निवडणुकीत महाजाथशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसोबत आता आमची मैत्री किंवा युती राहिलेली नाही,' असं मोहिलारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
To work for Peace, Unity and Development the Bodoland People’s Front (BPF) has decided to join hands with MAHAJATH in the forthcoming Assam Assembly Election. We shall no longer maintain friendship or alliance with BJP.
— Hagrama Mohilary (@HagramaOnline) February 27, 2021
गेल्या काही महिन्यांपासूनच भाजप आणि बीपीएफ यांचे संबंध बिघडले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काऊन्सिलच्या निवडणुकीत भाजपनं बीपीएफला सोबत घेतलं नाही. त्या निवडणुकीत बीपीएफला १७, भाजपला ९ तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला (यूपीपीएल) १२ जागा मिळाल्या.
सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार
बीपीएफनं भाजपची साथ सोडल्यानं काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा विस्तार झाला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीत बीपीएफसोबतच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचाही (राजद) समावेश झाला आहे. एआययूडीएफ, सीपीआय, सीपीएम (एम-एल) आणि आंचलिक गण मोर्चा (एजीएम) हे पक्ष आधीपासून काँग्रेसप्रणित आघाडीत आहेत.