आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की, ही वसाहत काळातील परंपरा होती. यातून आता आसाम विधानसभेने मुक्ती मिळवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोट्स करताना त्यांनी लिहिले आहे की, "आसाम विधानसभेने दोन तासांचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे. यामुळे काम आणि उत्पादकतेवर परिणाम होत होता. याच बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे. मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये ही प्रथा सुरू केली होती."
हिमंता पुढे म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष आणि आपल्या आमदारांचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानतो." अशा प्रकारे आता आसाम विधानसभेत मुस्लीम आमदारांना नमाजसाठी मिळणारा दोन तासांचा ब्रेक मिळणार नाही. आसामचे मुख्यमंत्री हिमंता म्हणाले, या निर्णयाच्या माध्यमाने आम्ही विधानसभेच्या उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे.
यासंदर्भात बोलताना भाजप आमदार बिस्वजीत फुकन म्हणाले, ब्रिटिश काळापासूनच आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाजसाठी 12 ते 2 या कालावधीत ब्रेक दिला जात होता. आता हा नियम बदलला असून ब्रेक मिळणार नाही. आसाम विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजीत यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचे सर्व आमदारांनी समर्थन केले.