ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम न झाल्याचेच पाहायला मिळत आहे. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊ पाहणा-यांना इशारा दिल्यानंतरही देशात अशा प्रकारच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आसाममधील सोनपूरमधील काही लोकांनी ट्रकमधून गाय घेऊन जाणा-या एका व्यक्तीला रस्त्यात रोखलं, इतकंच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली.
वृत्तसंस्था "एएनआय" दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी रस्त्याच्या मधोमध गाय घेऊन जाणारा ट्रक थांबवला व चालकाला मारहाण केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिसत आहे की, रस्त्याशेजारील एका ट्रकमागे काही जण उभे आहेत तर काही जण आत चढून ट्रकची तपासणी करत आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरच एका व्यक्तीला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. या प्रकरणी आता आसाम पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, 29 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली होणा-या हिंसेवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. यावेळी गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदी म्हणाले होते की, आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. गांधीजींच्या देशात आपण राहतो. त्यांनी आपला अहिंसेचा मार्ग कसा यशस्वी ठरतो, हे दाखवून दिले आहे. त्यांनी आणि विनोबा भावे यांनी आपल्याला गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, तोच आपण आत्मसात करायला हवा. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती.
दोनच दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका व्यक्तीच्या घराबाहेर गाय मरून पडल्याचे दिसताच, तेथील लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे घर पेटवून दिले. यापूर्वी हरियाणामध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीला गोरक्षकांनी ठारच मारले होते. गोरक्षकांनी आतापर्यंत अनेकांवर असे हल्ले केले आहे. मध्यंतरी राजस्थानात तामिळनाडू सरकारने गायी खरेदी केल्या. त्या ट्रकने नेणाऱ्यांवरही गोरक्षकांनी हल्ला केला होता.
ज्या देशात कुत्र्यांना खायला दिले जाते, मुंग्यांना अन्न दिले जाते, त्या देशातील लोकांना काय झाले आहे, ते हिंसाचार का करीत आहेत, असा सवाल करून मोदी म्हणाले की, रुग्ण मरण पावला की त्याचे नातेवाईक रुग्णालयच जाळू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू श्री राजचंद्र यांची शिकवण आपण समजून घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले होते.