प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हिमंता बिस्वा सरमा यांना नोटिस प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाने मागच्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान छत्तीसगड सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री मोहम्मद अकबर यांना लक्ष्य करणाऱ्या टिप्पणीवरून सरमा यांना नोटिस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देताना निवडणूक आयोगाने हिमंता बिस्वा सरमा यांना ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नोटिशीचं उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
१८ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमधील कवर्धा येथे केलेल्या भाषणादरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी मोहम्मद अकबरवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. अकबरला परत पाठवलं नाही तर माता कौशल्येची भूमी अपवित्र होईल. जर कुठून एखादा अकबर कुठून आला तर १०० अकबरांना बोलावतो. त्यामुळे जेवढं शक्य होईल, तेवढ्या लवकर त्यांना निरोप द्या, अन्यथा माता कौशल्येची भूमी अपवित्र होईल. भगवान श्रीरामांची माता कौशल्या ही सध्याच्या छत्तीसगडच्या भूमीवरील असल्याची मान्यता आहे.
निवडणूक आयोगाने सरमा यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, १८ ऑक्टोबर रोजी हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या भाषणाच्या काही भागामध्ये आदर्श आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. निवडणूक आयोगाने सरमा यांना ३० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याची सूचना दिली आहे.
आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगासमोर तक्रार नोंदवली होती. त्यात आरोप केला होता की, सरमा यांनी कवर्धा येथून त्यांच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या मोहम्मद अकबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.