नवी दिल्ली : आसामसरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याचा जोडीदार जिवंत असेपर्यंत त्याला इतर कोणाशीही लग्न करता येणार नाही आणि असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. खरं तर जोडीदार जिवंत असतानाही दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आसाम सरकारच्या कार्मिक विभागाने जारी केलेल्या आदेशात कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, पती किंवा पत्नी हयात असताना दुसरं लग्न करायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक असेल. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गोलाघाटमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी मोठा दावा केला होता. गोलाघाट येथील तिहेरी हत्याकांड हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले होते. मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना फूस लावून धर्मांतर करण्याच्या मोहिमेसाठी अलीकडे हा शब्द माध्यमांमध्ये झळकत आहे. उजव्या विचारसरणीचे नेत्यांनी आरोप करताना अनेकदा याचा वापर केला आहे. सरमा यांनी आरोपींविरुद्धचा खटला जलद गतीने चालवण्याच्या उद्देशाने १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासन दिले होते.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले होते की, हे पूर्णपणे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. मृत कुटुंब हिंदू असून आरोपी मुस्लिम समाजातील आहे. आरोपीने याआधी फेसबुकवर हिंदू नावाने स्वतःची ओळख करून दिली होती. जेव्हा हे जोडपे कोलकाता येथे पळून गेले तेव्हा संबंधित महिला ड्रग्ज घेण्यास शिकली. माहितीनुसार, संजीव घोष, जुनू घोष आणि संघमित्रा घोष अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या. सोमवारी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.