दिसपूर : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोमवारी आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट ( AFSPA) संदर्भात मोठे विधान केले आहे. या वर्षाच्या अखेरीस आम्ही आसाममधून AFSPA पूर्णपणे हटवू, असे हिमंत बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, राज्यातील पोलीस दलाला प्रशिक्षण देण्यासाठी माजी लष्करी जवानांची सेवा घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या आसाममधील आठ जिल्ह्यांमध्ये AFSPA लागू आहे.
कमांडंटच्या परिषदेत हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, हे पाऊल उचलल्यानंतर आसाम पोलिसांच्या बटालियनची जागा केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) मध्ये बदलणे सोपे होईल. कायद्यानुसार सीएपीएफची आवश्यक असणार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी आसाममधून AFSPA हटवला होता. मात्र हा कायदा अजूनही 8 जिल्ह्यांमध्ये लागू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, AFSPA अंतर्गत सुरक्षा दलांना विशेष अधिकार मिळाले आहेत, ज्यांचा दीर्घकाळ गैरवापर होत आहे. त्यावर एक वर्ग सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या कायद्याच्या आधारे सुरक्षा दल कोणालाही वॉरंटशिवाय अटक करू शकतात. इथेच नाही तर सुरक्षा दलाच्या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला तर या कायद्यामुळे त्यांना अटकेपासून आणि खटल्याला सामोरे जाण्यापासून सूट मिळते.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे AFSPA हटवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सरमा यांनी सांगितले होते की, अरुणाचल प्रदेशसोबतचा सीमावाद पूर्णपणे मिटला आहे. तसेच, मेघालयसोबत 12 पैकी 6 विवादित क्षेत्रांवर करार झाला आहे. उर्वरित 6 बाबतच्या कराराची चर्चा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.