आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्यक समुदायावर हल्ला चढवताना सरमा म्हणाले, या समाजातील लोकांना घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन आणि दरमहा १२५० रुपये मोदी सरकारकडून मिळाले. मात्र, त्यांनी मतदान काँग्रेसला केले. कारण त्यांना तुष्टीकरण हवे आहे. एवढेच नाही तर, त्यांचा उद्देश विकास नव्हे, तर मोदींना हटवून आपल्या समाजाचा दबदबा कायम ठेवणे होता, असेही सरमा म्हणाले, ते शनिवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.
आसाममध्ये NDA ला 11 जागा - आसाममध्ये NDA ने 14 पैकी 11 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना केवळ तीन जागाच मिळाल्या. मतांच्या टक्केवारीचा विचार करता, एनडीएला 47 टक्के तर I.N.D.I.A. ला 39 टक्के मते मिळाली. यावर बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, काँग्रेसच्या 39 टक्के मतांचे विश्लेषण केल्यास, हे संपूर्ण राज्यातून मिळालेले नाही. यातील 50 टक्के मते ही अल्पसंख्यक बहूल अशा 21 विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत, या भागांत भाजपला केवळ ३ टक्के मते मिळाली आहेत.
तीन गांधी आधीच लॉन्च झालेले आहेत - तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारणातील एन्ट्रीसंदर्भात प्रश्न केला असता सरमा म्हणाले होते, तीन गांधी तर आधीच लॉन्च झालेले आहेत. रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मुलांनीही लवकरच राजकारणात यावे, अशी माझी इच्छा आहे.