Maharashtra Politics:उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर अजब तर्क दिला आहे.
गुवाहाटीतील भीमाशंकर धाम ज्योतिर्लिंग मंदिर यात्रा सुरू आहे. भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे स्थान हे शिव पुराणानुसार कामरूप प्रदेशात आहे. आसाम सरकारने यासंदर्भातील एक जाहिरात दिली होती, ज्यावरून महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांमध्ये वाद झाला. जो वाद झाला त्या वादाची काही गरज नव्हती. भगवान शंकर भारतातील प्रत्येक भागांमध्ये आहेत. भारतीय सनातनी संस्कृतीची ताकद भागात पोहोचली आहे. भीमाशंकर मंदिर या ठिकाणी हजारो वर्षापासून आहे, असे हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पक्ष आणि पक्षचिन्हाची लढाई का हरले, यावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?
देवावर राजकारण केल्याने उद्धव ठाकरे हे पक्ष आणि चिन्हाची लढाई हरले आहेत. त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमवावे लागले आहे. खरेतर भगवान शंकराचे सहावे ज्योतिर्लिंग अशी ख्याती असलेले भीमाशंकर कुठे आहे यावरुन दोन राज्यांमध्ये वाद आहे. भगवान शंकराचे वास्तव्य हिमालयात असते. त्यांना कुठल्याही विशेष स्थानापर्यंत सीमित करता येणार नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शंकराच्या नावावर राजकारण करतो आहे. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिरावले गेले आहे, असा अजब तर्क हेमंत बिस्वा सरमा यांनी मांडला.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"