गुवाहाटी:आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत बोटीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 100 प्रवाशांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाली. या अपघातानंतर अनेकजण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 35 जणांचा वाचवण्यात यश आले आहे, तर 65 अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा सध्या शोध सुरू आहे. घटना जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बोट माजुलीहून निमतीघाटाकडे जात होती तर दुसरी बोट विरुद्ध दिशेने जात होती. या बोटींची समोरा-समोर टक्कर झाली. या दोन्ही बोटीत 100 प्रवासी होते, यातील 35 जणांना वाचवण्यात यश आले असून 65 जणांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत 100 प्रवाशांसह 25-30 मोटारसायकलही ठेवल्या होत्या. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बोट दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत माजुली आणि जोरहाट जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, मंत्री बिमल बोरा यांना माजुलीला पोहचून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे प्रधान सचिव समीर सिन्हा यांनाही सतत या घटनेशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्या माजुलीला पोहोचतील.