लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आसाममध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३०.९ टक्के मतांसह १२६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. भाजपने २९.५ टक्के मते आणि ६० जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती.
भाजपचे सहकारी आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी १२ टक्के मतांसह १४ आणि १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आघाडी ८६ पर्यंत पोहोचली. मागील निवडणुकीत सत्ता गमावलेल्या काँग्रेसने तत्पूर्वी १५ वर्षे राज्यात सरकार चालविले आहे. यंदा बहुपक्षीय आघाडीच्या आधारे सत्तेत परत येण्याची अपेक्षा पक्षाला आहे. जानेवारीत पक्षाने लोकसभा सदस्य बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफसोबत तसेच, भाकप, माकपा यांच्यासोबत आघाडी केली आहे. २०१६ पासून आतापर्यंत काँग्रेसची सदस्यसंख्या १९ वर पोहोचली आहे. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाले. हा पक्षासाठी मोठा झटका होता. पक्षाचे दोन आमदार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.
द्रमुकने जाहीर केले १७३ उमेदवार
चेन्नई : तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी १७३ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. स्टॅलिन हे पुन्हा एकदा कोलाथूर मतदार संघातून नशीब अजमावणार आहेत. त्यांचे पुत्र उदयनिधी हे चेपक-त्रिपलिकाने येथून निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ नेते दुरई मुरुगन, के. एन. नेहरू, के. पोनमुडी आणि एमआरके पनीरसेल्वम यांच्यासह ७९ विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत.
कमल हसन कोइम्बतूरमधून लढणारnअभिनेता ते नेता असा प्रवास करणारे कमल हसन तामिळनाडूत कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. nमक्कल निधि मय्यमच्या अध्यक्षांनी शुक्रवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिवंगत वडील श्रीनिवासन यांची आठवण करत कमल हसन यांनी विश्वास व्यक्त केला की, लोक आपल्याला विधानसभेत पाठवतील.