गुवाहाटी – आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला, तेव्हापासून स्वत:वरील परदेशी असल्याचा ठपका हटवण्यासाठी आस लावून बसलेले १०४ वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी निधन झालं. २ वर्षापूर्वी त्यांना परदेशी नागरिकांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याठिकाणी ३ महिने घालवल्यानंतर दास यांना जामीन मिळाला होता, मागील काही दिवसांपासून ह्दयाच्या आजाराने ग्रस्त असलेले दास यांनी परदेशी म्हणूनच दम तोडला.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार दास यांची मुलगी न्युती यांना ते दिवस आठवतात, जेव्हा चंद्रधर दास हे मोबाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होते, पंतप्रधानांचे भाषण ऐकून हसत ते म्हणाले, नरेंद्र मोदी देव आहेत, नागरिकत्व सुधारणा कायद्याने ते समस्येवर तोडगा काढतील, आपण सगळे भारतीय होऊ, चंद्रधर यांना नेहमी अपेक्षा होती की, एक दिवस त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल, ते जिथे कुठे नरेंद्र मोदींचा फोटो असेल तिथे हात जोडून नमस्कार करत होते असं न्युतीने सांगितले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चंद्रधर दास यांना खूप अपेक्षा होत्या. कायदा बनून एक वर्ष झाला तरी अद्याप ज्यांना देव मानत होते त्या मोदींनी काय केले? चंद्रधर यांना फक्त भारतीय म्हणून मरायचं होतं, आम्ही खूप प्रयत्न केले, कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, वकिलांपासून सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सर्व कागदपत्रे जमा केली आणि आता चंद्रधर दास जग सोडून गेले, आम्ही आताही कायद्याच्या दृष्टीने परदेशी आहोत. नागरिकत्व सुधारणा कायद्याने आमच्यासाठी काहीच केले नाही अशी खंत दास यांची मुलगी न्युतीने व्यक्त केलं.
काय आहे चंद्रधर दास यांची कहाणी?
चंद्रधर दास यांचा मुलगा गौरांगने सांगितले की, ते पूर्व पाकिस्तानमधून भारतात आले होते, त्याठिकाणी खूप हत्या होत होत्या, त्यासाठी सीमा ओलांडून भारताच्या त्रिपुरामध्ये त्यांनी प्रवेश केला, याठिकाणी जवळपास ५०-६० दशकं वास्तव्य केले. त्रिपुरावरून दास यांनी संघर्ष करत आसाम गाठलं, उदरनिर्वाहासाठी ते लाडू विकत होते. त्यानंतर एकेदिवशी २०१८ मध्ये काही अधिकाऱ्यांनी दास यांना घरातून उचलून नेलं आणि परदेशी लोकांसाठी बनवण्यात आलेल्या डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवलं.
जून २०१८ मध्ये दास यांना जामीन मिळाला परंतु त्यांच्या कुटुंबाचे हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात दास यांना डिमेंशियाचा आजार झाला होता. ते खात-पित होते, झोपत होते, परंतु बोलणं कमी झालं होतं. जेव्हा ते बोलत होते तेव्हा खटल्याबद्दल विचारायचे. या समस्येवर मोदी लवकर तोडगा काढतील असा विश्वास चंद्रधर दास यांना होता. अजूनही खटल्याचा निकाल लागला नाही हे सांगण्याची हिंमत आमच्यात नव्हती. भारताचं नागरिकत्व घेऊन जीवन संपवण्याचं त्यांची अखेरची इच्छा होती. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होण्यास उशीर झाला आणि शेवटी परदेशी म्हणूनच चंद्रधर दास यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
दरम्यान, चंद्रधर यांच्या मृत्युनंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दास यांच्या कुटुंबाची भेट घेत नागरिकत्व सुधारणा कायदा फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी आणलं होतं, तसेच डिटेंशन कॅम्पमध्ये असणाऱ्या लोकांना भाजपा मदत करत नाही असा आरोप त्यांनी केला तर भाजपा खासदार राजदीप राय यांनी दास यांच्या निधनावर शोक व्यक्त करत जे घडलं ते दुर्दैवी आहे. कोरोना महामारीमुळे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या प्रक्रियेत विलंब झाला असं त्यांनी सांगितले.