"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:51 PM2021-04-02T14:51:48+5:302021-04-02T15:06:57+5:30
Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे.
नवी दिल्ली - आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं सांगण्यात येतं आहे. निवडणूक आयोगाने संबंधित 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. त्यानंतर, याप्रकरणी निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आयोगाला सुनावलं आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "क्या स्क्रिप्ट है? निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?" असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाची गाडी खराब झाली होती, त्यामुळे भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट मागण्यात आली, अशी प्राथमिक माहिती आहे.
क्या स्क्रिप्ट है?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
चुनाव आयोग की गाड़ी खराब हुई, तभी वहां एक गाड़ी प्रकट हुई। गाड़ी भाजपा के प्रत्याशी की निकली। मासूम चुनाव आयोग उसमें बैठ कर सवारी करता रहा।
प्रिय EC, माजरा क्या है? आप देश को इस पर कुछ सफाई दे सकते हैं? या हम सब मिलकर बोलें EC की निष्पक्षता को वनक्कम? pic.twitter.com/LcQ4nFE3Xi
आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत, निवडणूक आयोगाने तपास करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन भाजपावर आरोप केले आहेत.
पोलिंग बुथवर पुन्हा मतदान
निवडणूक आयोगाने तपासाअंती कारमधील ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलंय. तसेच, ईव्हीएमसह बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट मशिनला स्ट्राँग रुममध्ये सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे. तरीही, खबरदारी म्हणून रताबारी विधानसभा क्षेत्रातील पोलिंग स्टेशन इंदिरा एम.वी. स्कूलच्या पोलिंग बूथ नंबर 149 येथे पुन्हा एकदा मतदान घेण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.
"पंतप्रधान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारतात", उदयनिधी स्टॅलिन यांचा गंभीर आरोपhttps://t.co/AgcfWbmn7o#UdhayanidhiStalin#NarendraModi#SushmaSwaraj#ArunJaitley#BJP#Politics#Indiapic.twitter.com/EjWyTL2X0D
— Lokmat (@MiLOKMAT) April 2, 2021