गुवाहाटी: पुरामुळे आसाम राज्यात हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. अशातच, आजारी व्यक्तींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. दरम्यान, एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात आसामचे परिवहन मंत्री परिमल सुक्लाबैद्य स्वतः बोट चालवत एका रुग्णाला पुराच्या पाण्यातून हॉस्पिटलमध्ये नेताना दिसत आहेत.
सध्या राज्यात काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे. व्हिडिओमध्ये अनेक लोक बोटीजवळ गुडघ्यापर्यंत पाण्यात चालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे परिवहन मंत्री परिमल सुक्लबैद्य सध्या सिलचर, कचार येथे तळ ठोकून आहेत. ते स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बराक खोऱ्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अधिकार्यांच्या माहितीनुसार, आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे आणि 30 जिल्ह्यांमध्ये 45.34 लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. सर्वाधिक प्रभावित बारपेटा जिल्ह्यात 10,32,561 लोक पुरामुळे त्रस्त आहेत.