गुवाहटी : मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. तसेच, त्यांना पाठिंबा देण्याची अधिक आवश्यकता आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक चांगला निर्णय घेतला असून त्याचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, आसाममध्ये शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला वर्गामध्ये येण्यासाठी दररोज 100 रुपये मिळणार आहेत. एजन्सीच्या अहवालानुसार, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.
याचबरोबर, चालू महिन्याच्या अखेरीस दिवसाला १०० रुपयांची योजना सुरू केली जाईल. इतकेच नाही तर राज्य सरकार १२ वीच्या बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना प्रज्ञान भारती योजनेंतर्गत २२,००० दुचाकींचे वाटप करणार आहे, असेही शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
या योजनेसाठी १४४.३० कोटी रुपये खर्च केले जातील. राज्य बोर्डातून प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींना सरकार स्कूटर भेट देणार आहे. जर विद्यार्थीनींची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असेल तरीही सरकार त्यांना स्कूटर देणार आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये प्रथम श्रेणीमध्ये इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींना देखील स्कूटर दिली जाणार आहे, असे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.
'यांना' मिळाणार दोन हजार रुपये शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीअखेरपर्यंत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींच्या बँक खात्यात १,५०० आणि २ हजार रुपये जमा केले जातील. ही रक्कम त्यांच्या पुस्तक आणि इतर अभ्यास सामग्री इत्यादींच्या खरेदीसाठी उपयुक्त ठरेल. गेल्या वर्षी सरकार या दोन्ही आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू करणार होती, परंतु कोरोनामुळे सुरू होऊ शकली नाही. आता सरकार तातडीने या योजनेची अंमलबजावणी २०२१ पासून सुरू करणार आहे.