नवी दिल्ली : भारताच्या ईशान्य भागात असलेल्या एका राज्याने कोरोना लसीबाबत (Corona Vaccine) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आसाममध्ये (Assam) लस न घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर, अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी तत्काळ प्रवेश दिला जाणार नाही.
आसाममध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात ही कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Hemant Biswa Sarma) म्हणाले की, ज्यांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine)दोन्ही डोस घेतलेले नाहीत, त्यांना उद्यापासून जिल्हा न्यायालय, हॉटेल, बाजारपेठ आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, अद्याप अशी परिस्थिती नाही, मात्र मास्क घालणे अनिवार्य आहे.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 2,58,089 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. कालच्यापेक्षा हा आकडा 13,113 रुग्णांनी कमी आहे. तर 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 1,51,740 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 16,56,341 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट 119.65 टक्क्यांवर गेला आहे. तर ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 8,209 वर गेला आहे.
आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे 157.20 कोटी डोस देण्यात आले आहेत. चाचणीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार, भारतात काल म्हणजेच रविवारपर्यंत 13,13,444 चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 70,37,62,282 चाचण्या करण्यात आल्या आहेत.