गुवाहाटी : आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आपल्या पत्नीच्या निधनानंतर स्वत:चा जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पत्नीच्या मृतदेहासमोर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर स्वत:वर गोळी झाडली. पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच त्यांनी आत्महत्या केली. त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होती. दोन महिन्यांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आयसीयूमध्ये आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरने पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:वर गोळी झाडली. येथेच काही मिनिटांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहसचिव म्हणून पोस्टिंग होण्यापूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) आणि आसामपोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. त्यांनी राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले होते. त्यांचे वय ४४ वर्षे होते. शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.२५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. १० मिनिटांनंतर शिलादित्य चेतिया यांनीही या जगाचा निरोप घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदा आयसीयू केबिनमध्ये गेले आणि पत्नीच्या मृतदेहाजवळ प्रार्थना करायची आहे. यासाठी मला काही काळ एकटे सोडा, अशी विनंती वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केली. त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी आयसीयूमधून बाहेर पडले. यानंतर त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केली. गोळीबाराच्या आवाजाने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेमकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक हितेश बरुआ यांनी सांगितले की, "आम्ही गोळीचा आवाज ऐकला आणि आयसीयूमध्ये गेलो. तेव्हा शिलादित्य चेतिया हे पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले होते. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. तसेच, त्यांच्या पत्नी अगमोनी यांच्यावर जवळपास दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आम्ही शिलादित्य चेतिया यांना त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले आणि त्यांना आमचे म्हणणे समजले होते."