गुवाहाटी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल झाले. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. अकुशल कामगार आणि असंघटितांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. त्यातच आता आसामची राजधानी गुवाहाटीपासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरीगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामस्थांची मोठी फसवणूक झाली आहे. मोरीगाव जिल्ह्यातील धरमतुल गावात अवैधपणे ग्रामस्थांच्या किडनी काढून घेण्यात आल्या आहेत. एक महिला आणि तिचा मुलगा कागदपत्रांवर गावातल्या एका गरीब व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचं काही दक्ष ग्रामस्थांनी पाहिलं. त्यामुळे अवैधपणे ग्रामस्थांच्या किडनी काढून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
धरमतुल गावातील बहुतांश लोक गरीब आहेत. त्यांच्यावर सावकारांचं कर्ज आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या किडनी विकल्या. आतापर्यंत १२ ग्रामस्थांनी किडनी विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचेही ग्रामस्थांना पूर्ण पैसे मिळाले नाहीत. किडनी देण्याआधी त्यांना सांगण्यात आलेली रक्कम आणि किडन्या काढून धेण्यात आल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम यात मोठी तफावत आहे. कोलकात्यातील एका रुग्णालयाचा किडनी रॅकेटमध्ये सहभाग होता. हे रुग्णालय आधीपासूनच पोलिसांच्या रडारवर होतं.
धरमतुलमध्ये वास्तव्यास असलेल्या ३७ वर्षीय सुमंत दास पेशानं मेस्त्री आहेत. लॉकडाऊनमुळे वर्षभर हाती काम नसल्यानं त्यांचा आर्थिक स्थिती दयनीय झाली. त्यांच्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्यानं त्याचा उपचारांवरदेखील मोठा खर्च होतो. पैशांची गरज असल्यानं त्यांनी किडनी विकली. किडनीचे पाच लाख रुपये मिळतील असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांना प्रत्यक्षात केवळ दीड लाख रुपयेच मिळाले. किडनी काढण्यात आल्यानं आता त्यांना कष्टाची कामं करता येत नाहीत. वजनदेखील उचलता येत नाही. गावातील अनेकांची अवस्था सुमंत यांच्यासारखीच झाली आहे.