गुवाहाटी: हिंदू व्यक्तीला रक्ताची गरज असल्यानं मुस्लिम तरुणानं त्याचा रमझानचा उपवास मोडला. आसामच्या मंगलडोईमध्ये ही माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली. हिंदू व्यक्तीला रक्ताची नितांत आवश्यकता असल्यानं पनाउल्लाह अहमदनं रमझानचा उपवास मोडण्याचा निर्णय घेतला. अहमदचा सहकारी आणि रुममेट तपश भगवतीला 8 मे रोजी एक फोन आला. धेमाजी जिल्ह्यातल्या रंजन गोगोई नावाच्या रुग्णाला रक्ताची गरज असल्याची माहिती तपशला फोनवर मिळाली. यानंतर अहमदनं रमझानचा उपवास सोडण्याचा निर्णय घेतला. गोगोई यांच्यावर गुवाहाटीतल्या अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या शरीरातून गाठ काढण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी काही जणांशी रक्तासाठी संपर्क साधला. मात्र कोणालाही रुग्णालयात पोहोचणं शक्य नव्हतं. त्यानंतर अहमदनं गोगोईंना मदत करण्याचा निर्णय घेतला. 'न्यूज 18'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अहमद आणि तपश टीम ह्युमॅनिटी- ब्लड डोनर्स अँड सोशल ऍक्टिव्हिस्ट इन इंडियाचे सदस्य आहेत. हे दोघेही गुवाहाटीच्या स्वागत सुपर स्पेशॅलिटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये काम करतात. अहमदनं रक्तदान करण्यापूर्वी त्याच्या परिचयाच्या काही जणांना उपवास कायम ठेवून रक्त देऊ शकतो का याबद्दल विचारणा केली. मात्र असं केल्यास आजारी पडण्याचा धोका असतो, अशी माहिती त्याला अनेकांनी दिली. त्यामुळेच अहमदनं उपवास सोडण्याचा निर्णय घेतला.
धर्मापेक्षा माणुसकी मोठी! हिंदू व्यक्तीसाठी त्यानं मोडला रमझानचा उपवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 10:54 PM