आसाममधील दारंग जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. येथे एक व्यक्ती नाण्यांनी भरलेलं पोतं घेऊन स्कूटर विकत घेण्यासाठी आला होता. त्याला पाहून सर्वांनाच धक्का बसला. सैदुल हक असं या व्यक्तीचं नाव असून तो दारंग जिल्ह्यातील सिफाझार भागातील रहिवासी आहे. नाण्यांनी भरलेलं पोतं घेऊन तो बेधडकपणे शोरूममध्ये शिरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याला पाहून शोरूममध्ये उपस्थित कर्मचारीही हैराण झाले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सैदुल हक स्कूटर घेण्यासाठी पाच आणि दहाची शेकडो नाणी घेऊन आला होता. सैदुलने दिलेल्या माहितीनुसार, 'मी बडगाव परिसरात छोटेसे दुकान चालवतो. स्कूटर घेण्याचं माझं स्वप्न होतं. मी 5 ते 6 वर्षे नाणी गोळा करत होतो. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला यश मिळाले आहे. मी खरोखर खूप आनंदी आहे.
गोणीतील नाणी पाहून शोरूमचे कर्मचारीही हैराण झाले. या व्यक्तीने उपस्थित कर्मचाऱ्यांना नाण्यांसह स्कूटर घ्यायची असल्याचे सांगितल्यावर कर्मचाऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. एखादी व्यक्ती इतकी नाणी कशी गोळा करू शकते की त्यातून स्कूटर विकत घेऊ शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मात्र कर्मचाऱ्यांनी नाणी मोजण्यास सुरुवात केल्यावर त्यांचा घाम फुटला. स्कूटर घेण्याइतकी नाणी गोणीत होती.
शोरूमचे कर्मचारी सैदुल हक यांना भरण्यासाठी फॉर्म देतात. फॉर्म भरल्यानंतर हक आपलसं नाण्याचं पोत उघडतो आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांची मोजणी करतो. यानंतर ही नाणी वेगवेगळ्या बॉक्समध्ये भरण्यात आली. दुचाकी शोरूमच्या मालकाने सांगितले, 'जेव्हा माझ्या एक्झिक्युटिव्हने मला सांगितले की एक ग्राहक स्कूटर घेण्यासाठी आमच्या शोरूममध्ये 90,000 रुपयांची नाणी घेऊन आला होता. हे जाणून मला आनंद झाला. कारण अशा बातम्या मी टीव्हीवर पाहिल्या होत्या. त्याने भविष्यात कार खरेदी करावे अशी माझी इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"