गुवाहटी - आसाममध्ये जमावाकडून एका 68 वर्षीय मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. शौकत अली असे या व्यक्तीचे नाव असून बीफ विकत असल्याच्या कारणावरुन त्यास जमावाने जबर मारहार केली. त्यानंतर, जबरदस्तीने डुकराचे मांसही खाऊ घालण्यात आले. आसामच्या बिश्वनाथ चरैली येथे 7 एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत असुदुद्दीन औवेसी यांनीही खेद व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर सध्या त्या व्यक्तीचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जमावापुढे शौकत अली यांनी चक्क शरणागती पत्करत चिखलात गुडघे टेकल्याचं या व्हीडिओत दिसत आहे. तसेच, तू बीफ का विकतो आणि तुझ्याकडे बीफ विकायचं लायसन्स आहे का, असा प्रश्नही या जमावाकडून शौकतला विचारण्यात येत आहे. तर, तू नेमका कोणत्या देशाचा आहे, बांग्लादेशी आहेस का, असे म्हणत त्यास मारहाण करण्यात येत आहे.
पोलिसांच्या मतानुसार, अली हा व्यापारी असून तो गेल्या 35 वर्षांपासून संबंधित व्यवसाय करत आहे. आठवडा बाजारातील एका कोपऱ्यावर बीफ विकल्याच्या कारणावरुन जमावाने शौकतला मारहाण केल्याचंही पोलिसांनी म्हटले. काही समाजकंटकांकडून शौकतला खाली पाडून मारहाण करण्यात आली. तसेच डुकराचे मांसही जबरदस्तीने खाऊ घालण्यात आले. त्यामुळे काही काळ तेथील परिस्थिती तणावसदृश्य बनली होती.
दरम्यान, शौकल अली यांस जखम झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर एमआयएमचे खासदार असुद्दीन औवेसी यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच या घटना मला दु:खी करतात. गेल्या 5 वर्षात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे अनेकजण निराश बनले आहेत. अनेकांना हे व्हीडिओ विचलित करतात. पण, मी या व्हीडिओमुळे विचलित होणार नाही, असेही औवेसी यांनी म्हटले आहे.