देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर होणार आहेत. मात्र, यापूर्वीच आसाममधील नगरपालिका निवडणुकीत (Assam Municipal Election) भाजपने दणदणीत विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. आसाम राज्य निवडणूक आयोगाने (ASEC) बुधवारी जाहीर केलेल्या निवडणूक निकालांनुसार, आसाममधील नगरपालिका निवडणुकीत भाजपने एकूण 80 जागांपैकी 75 जागांवर कब्जा केला आहे. (Assam Municipal Election Result)
या निवडणुकीत भाजपसोबत युतीत असलेल्या आसाम गण परिषदेने 2 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. महत्वाचे म्हणजे, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत 80 पैकी केवळ एकाच नगरपालिकेत विजय मिळवता आहे. यामुळे काँग्रेसच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. तर इतर पक्षांनी 2 नगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. 6 मार्चला ईव्हीएमच्या माध्यमाने येथे मतदान झाले होते.
मुख्यमंत्री हिमंता यांनी केलं कार्यकर्त्यांचं अभिनंदन -हिमंता बिस्वा सरमा ट्विट करत म्हणाले, 'मी सर्व @BJP4 आसाम कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या आदर्शांचा प्रसार प्रचार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. महापालिका निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या घवघवीत विजयाबद्दल मी आसामच्या जनतेचेही आभार मानतो.'
2 नगरपालिकांत त्रिशंकू -आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने या नगरपालिका निवडणुकीत एकूण 672 वार्डमध्ये विजय मिळवला. तर काँग्रेसने 71 आणि इतरांनी 149 वॉर्डमध्ये विजय मिळवला. तर एकूण 57 वार्ड बिनविरोध झाले. ASEC च्या नुकालांनुसार, Mariani म्युनिसिपल बोर्डच्या 10 पैकी 7 वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर उरवरीत 3 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तसेच या निवडणुकीत 2 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू निकालही समोर आला आहे.