नवी दिल्ली - आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. राजधानी गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. मात्र, बुधवारी पावसामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. बोरगाव येथे मंगळवारी दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याचाही यात समावेश आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर, सोनापूर, कालापहार आणि निजारापार भागात भूस्खलनामुळे ढिगारा साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अनिल नगर, नवीन नगर, राजगड लिंक रोड, रुक्मिणीगाव, हाटीगाव आणि कृष्णा नगर या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात NDRF आणि SDRF कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
जनजीवन विस्कळीत
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटींचा वापर केला जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका आणि त्यांना मदत साहित्य पुरवण्याचं काम सुरू आहे. आसाम वीज वितरण कंपनी लिमिटेड (APDCL) मंगळवारपासून वीज नसलेल्या शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे. पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
अतिवृष्टीचा इशारा
कामरूप महानगर उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) जारी केलेल्या पावसाचा इशारा लक्षात घेऊन वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आसाममध्ये 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूर आला होता. आता मान्सूनच्या आगमनानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.