नवी दिल्ली - आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वीज पडून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. भीषण परिस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 21 हजार लोकांना पावसाचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या अनेक भागात 'बोरदोइसिला' ने कहर केला आहे. उन्हाळ्यात येणारे वादळ आणि पाणी याला आसाममध्ये 'बोरदोइसिला' म्हणतात. यात जीवितहानी व्यतिरिक्त घरांचं नुकसान झालं आहे. झाडं उन्मळून पडली आहेत आणि तुटलेल्या वीजवाहिन्यांचा समावेश आहे.
गेल्या दोन दिवसांत राज्यात किमान 7,378 घरे आणि इतर आस्थापनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस आणि वादळ यामुळे तब्बल 21 हजारांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. शुक्रवारी डिब्रुगडमध्ये झालेल्या भीषण वादळामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत वादळामुळे राज्याच्या विविध भागात शेकडो झाडे आणि विद्युत खांब पडले. विविध ठिकाणी अनेक घरांचे नुकसान झालं. गोलपारा, बारपेटा, डिब्रुगडमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD ने सांगितले की, पुढील पाच दिवसांत भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 18 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम भारतातील हवामानावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात एका चक्रीवादळामुळे 1000 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीडीओ कार्यालय, शाळा, पशुसंवर्धन कार्यालय तसेच परिसरातील अनेक इमारतींना त्याचा फटका बसला आहे. तसेच 5 एप्रिल रोजी पावसामुळे झालेल्या भूस्खलनात राज्यातील दोन जणांनी जीव गमवावा लागला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.