दिब्रुगढ (आसाम) : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा ( Omicron) संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत, हा नवीन व्हेरिएंट शोधण्यासाठी, लोकांचे सॅम्पल घेऊन जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले जात होते, त्याचा रिपोर्ट येण्यास बराच वेळ लागत होता. मात्र, आसाममधील दिब्रुगडमध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरने (RMRC) एक किट विकसित केली आहे, जी केवळ दोन तासांत नवीन कोरोना व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शोध लावू शकते.
ज्या प्रवाशांना नवीन व्हेरिएंटच्या टेस्टिंगबाबत विमानतळावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. दिब्रुगढमधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची टीम 24 नोव्हेंबरपासून या किटवर काम करत होती. त्यांनी कोरोना रूग्णांच्या 1,000 हून अधिक सॅम्पलचे टेस्ट केले आहे, ज्यात इतर काही राज्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट आढळून आला होता.
सध्या या टेस्टिंग किटची परवाना प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यापासून हे किट लॅबसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे.
डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांनी सांगितले की, ICMR-RMRC टीमने कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (B.1.1.529) SARS-CoV-2 (COVID-19) शोधण्यासाठी हायड्रोलिसिस टेस्ट-आधारित रिअल-टाइम RT-PCR ला डिझाइन केले आहे. याच्या मदतीने ओमायक्रॉन व्हेरिएंटच्याबाबत माहिती दोन तासांत कळेल. तसेच, जीसीसी बायोटेक ही कोलकाता स्थित कंपनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर किट तयार करत आहे. दरम्यान, टेस्टिंग किटचा वापर त्या प्रयोगशाळांमध्ये केला पाहिजे, जिथे RT-PCR सुविधा आहे.