आसाममध्येही ‘व्यापमं’ घोटाळा, मुख्यमंत्री सोनोवाल यांनी राजीनामा द्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:19 AM2020-09-30T06:19:54+5:302020-09-30T06:21:17+5:30
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी राजीनामा द्यावा -रणदीप सुरजेवाला
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये ‘व्यापमं’ (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळा झाला होता, तसाच तो भाजपची सत्ता असलेल्या आसाममध्येही झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ५९७ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तींसाठी परीक्षा आयोजित केली गेली होती. त्याच्याशी संबंधित हा घोटाळा आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार ५९७ जागांसाठी ६६ हजार इच्छुकांनी अर्ज केले व त्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका माफियांनी उघडपणे पैसे घेऊन विकली. हे समजताच काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, भाजप सरकारचा रोजगाराशी जोडलेला हा दुसरा व्यापमं घोटाळा आहे. या प्रकरणात भाजपचे नेते देबन डेका यांना अटक झाली; परंतु कोणाच्या शिफारशींवर त्यांना सोडून दिले गेले व आता ते कोठे आहेत? हे सांगावे, असे ते म्हणाले.
माजी डीआयजींचे पेपरफुटीच्या प्रकरणात नाव
राज्याचे माजी डीआयजी पी.के. दत्ता यांचे नाव पेपरफुटीत घेतले जात आहे. सरकारने हे सांगावे की, दत्ता यांचे कोणाकोणाशी संबंध आहेत आणि पोलीस या कथित घोटाळ्याशी संबंधित लोकांना का पकडत नाहीत. सुरजेवाला यांनी थेट मुख्यमंत्री सोनवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच केली. सोनोवाल यांच्याकडे गृहमंत्रालयाचीही जबाबदारी आहे.