गुवाहाटी - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. यातच आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की, राज्याने केंद्राला पत्र लिहिले असून यामध्ये लॉकडाऊन 18 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची शुक्रवारी गुवाहाटी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात शुक्रवारपर्यंत सर्व राज्यांना आपल्या सूचना देण्यास सांगितले होते. त्यानुसार आसाम सरकारने आपली भूमिका केंद्राला कळविली आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या सूचनांमध्ये लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यासाठी आवश्यक असलेल्या सवलतींबाबतही मत मांडले आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. केंद्र सरकारला यावर विचार करण्यास वेळ दिला पाहिजे. मला आत्ता याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. सर्व राज्यांनी केंद्राला पत्र लिहिले असून ते लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेतील, असेही सर्वानंद सोनोवाल यांनीही म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 तारखेला संपणार आहे. लॉकडाऊन वाढविण्याबाबत सर्व राज्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सर्व राज्यांना 15 तारखेपर्यंत आराखडा सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.