शिवसागर/आमगुडी : सांप्रदायिकता आणि विभाजनवादी अशा दोन धोकादायक शक्ती आसाममध्ये एकत्र आलेल्या आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजपप्रणीत आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या जनतेचा अवमान करीत आहेत आणि विकासाच्या आश्वासनापासून पाठ फिरवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.आपण लोकांना आसामचा चहा विकला आणि त्यामुळे आसामशी आपले विशेष संबंध आहेत, या मोदींच्या वक्तव्याचाही सोनिया गांधींनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ‘आमचे अच्छे दिन केव्हा येतील’, असे चहा मळ्यात काम करणारे मजूर आणि आदिवासी विचारत आहेत.मोदी सरकार काँग्रेसी सरकारे उलथविण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निर्वाचित सरकारे पाडण्यासाठी सर्व काही केले, असे त्या म्हणाल्या.आता इतर राज्यातील काँग्रेस सरकारे पाडण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे’, असा आरोप सोनिया गांधी यांनी आसामच्या विश्वनाथ छरियाली येथे एका निवडणूक प्रचार सभेत केला.(वृत्तसंस्था)