चंडीगड : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (२७) यांची रविवारी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाबमधील मान सरकारने शनिवारीच त्यांची सुरक्षा काढली होती. यापूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. पण, सध्या त्यांच्याकडे केवळ दोन गनमॅन होते. मुसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते.
मुसेवाला हे मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात आपल्या वाहनातून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या घातल्या. हल्लेखोर एका काळ्या रंगाच्या वाहनातून आले होते. मुसेवाला यांचे दोन सहकारी यात जखमी झाले आहेत. मुसेवाला यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुसेवाला यांच्या घरापासून ५ कि.मी. अंतरावर हल्ला झाला. या वेळी ते स्वत: वाहन चालवीत होते. पंजाबी गायक म्हणून त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या गाण्यांमुळे ते अनेकदा वादात सापडले होते.
श्री केसगढ साहिबच्या जत्थेदारांचा सुरक्षा घेण्यास नकार
पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने श्री अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या सुरक्षेत कपात केल्याचा वाद वाढला आहे. श्री केसगढचे जत्थेदार रघुबीर सिंह यांनी त्याच्या विरोधात त्यांच्या सुरक्षेतील जवानांना परत पाठवले आहे. दोन्ही जत्थेदारांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या (एसजीपीसी) टास्क फोर्सकडे आहे. एसजीपीसीचे अध्यक्ष एच. एस. धामी यांच्या निर्देशांचा हवाला देत उप सचिव तेजिंदर सिंह यांनी सांगितले की, श्री अकाल साहिबच्या जत्थेदारांची सुरक्षा परत घेणे चिंताजनक आहे. एसजीपीसीने कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. कोणाची सुरक्षा परत घेणे किंवा न देणे, हा सरकारचा निर्णय असतो. परंतु ज्या जत्थेदारांची सुरक्षा परत घेतली, त्यांना एसजीपीसीने सुरक्षा दिली आहे.
सुरक्षा काढल्याने होते चिंतेत
आपली सुरक्षा घटविण्यात आल्याने मुसेवाला हे काळजीत होते. पर्यायी उपाययोजनेसाठी त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चाही केली होती. आपल्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. पंजाब सरकारने कोणतीही नोटीस न देता आपली सुरक्षा कमी केली असून, हे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून निवडणूक लढविली होती. ‘आप’चे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा पराभव केला होता. आरोग्यमंत्री करण्यात आलेल्या सिंगला यांना अलीकडेच मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आले होते.