नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशी खरमरीत टिप्पणी काल मद्रास उच्च न्यायालयानं केली. उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. निवडणूक असलेल्या राज्यांत हजारोंच्या सभा सुरू होत्या, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का, अशा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. यानंतर आता निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २ मे रोजी चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर विजयी मिरवणुका काढू नका, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणूक आयोगानं मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आयोगाकडून आदेश काढण्यात येणार आहे.
निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी विचारला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला.'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता
देशातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आणि घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागते ही बाब दुर्दैवी आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीनं दिला आहे. पण जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना हा अधिकार बजावता येईल. सध्या बचाव आणि सुरक्षेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे. बाकीच्या बाबी यानंतर येतात, असं न्यायमूर्ती म्हणाले.