नवी दिल्ली - पुढच्या वर्षात 2022च्या सुरुवातीला देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंचावणे आवश्यक आहे. याशिवाय उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर येथेही विधानसभा निवडणुका होणार आहेत. (Assembly election 2022 ABP c voter survey for Uttar Pradesh Uttarakhand Punjab Goa and Manipur )
उत्तर प्रदेशात कुणाचं पारड राहणार जड? कोणाला किती जागा मिलू शकतात? -उत्तर प्रदेशात होणाऱ्या 2022 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला 259 ते 267 जागा मिळू शकतात. तर समाजवादी पक्षाला 109 ते 117 जागा, बसपाला 12 ते 16 जागा, काँग्रेसला 3 ते 7 जागा आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळू शकतात. उत्तर प्रदेशात जनता कोणत्या मुद्द्याला मतदान करेल? यासंदर्भात 3 टक्के लोकांनी भ्रष्टाचार, 39 टक्के लोकांनी बेरोजगारी, 26 टक्के लोकांनी महागाई, 19 टक्के लोकांनी शेतकरी, 10 टक्के लोकांनी कोरोना तर 3 टक्के लोकांनी इतर मुद्दे, असे सांगितले.
या एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणात, भाजप युतीला 42 टक्के, समाजवादी पार्टी आघाडीला 30 टक्के, बहुजन समाज पार्टीला 16 टक्के, काँग्रेसला 5 टक्के, तर इतरांना 7 टक्के मते मिळू शकतात, असे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात तब्बल 45 टक्के लोकांनी सांगितले की, ते उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामगिरीवर अत्यंत समाधानी आहेत. 20 टक्के लोकांनी कमी समाधानी असल्याचे म्हटले आहे. तसेच, 34 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. या शिवाय एक टक्का लोकांनी सांगू शकत नाही, असे म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये कुणाला किती जागा -उत्तराखंडमधील सर्वेक्षणानुसार भाजपला 44 ते 48 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पार्टीला 0 ते 4 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज सी मतदार सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 23 टक्के, आम आदमी पार्टीला 6 टक्के आणि इतरांना 4 टक्के मते मिळू शकतात.
अशी असू शकते पंजाबची स्थिती -एबीपी न्यूज सी व्होटर सर्वेक्षणानुसार, पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसला 28.8 टक्के, शिरोमणी अकाली दलला 21.8 टक्के, आम आदमी पार्टीला 35.1 टक्के, भाजपला 7.3 टक्के आणि इतरांना 7 टक्के मतदान होऊ शकते. याशिवाय, येथील 18 टक्के जनतेला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. तर 22 टक्के लोकांना अरविंद केजरीवाल, 19 टक्के सुखबीर बादल, 16 टक्के भगवंत मान, 15 टक्के नवज्योतसिंग सिद्धू आणि 10 टक्के लोकांना इतर कुणी मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे असे वाटते.
पंजाबमध्ये आपला 51 ते 57 जागा मिळू शकतात -या सर्वेक्षणानुसार, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळू शकतात. दुसरीकडे अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 1 जागा मिळू शकते आणि इतरांनांही केवळ एकच जागा मिळू शकते.
गोव्यात फुलू शकतं भाजपचं कमळ - गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार बनवू शकते. येथे 22 ते 26 जागा भाजपच्या खात्यात येऊ शकतात. तर काँग्रेसला 3-7 जागा मिळू शकतात. याशिवाय, 4-8 जागा आम आदमी पक्षाला आणि 3-7 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. याशिवाय एकूण मतांचा विचार करता, भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 15 टक्के, तर आम आदमी पार्टीला 22 टक्के आणि इतरांना 24 टक्के मते मिळू शकतात.
मणिपूरमध्ये कोणाला किती मते आहेत?या सर्वेक्षणानुसार, मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर 35 टक्के मते काँग्रेस, 6 टक्के एनपीएफ आणि 17 टक्के मते इतरांना मिळण्याची शक्यता आहे.