नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. मोदींबाबत असा प्रसंग बहुधा पहिल्यांदाच आला आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपण्यास केवळ दहा दिवस उरले आहेत, मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका या मोदींच्या नावावरच लढविण्यात आल्या. २०१७ साली उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला तीन चतुर्थांश बहुमत मिळाले होते. मोदी यांच्या कार्याकडे पाहून त्या राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाने वेगळी रणनिती अवलंबली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी हे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यात २६ प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपने लढविलेल्या २९४ जागांपैकी त्या पक्षाला फक्त ७२ ठिकाणी विजय मिळाला. त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकांतही मोदी यांनी जोरदार प्रचार केला होता.
नेत्यांशी स्पर्धा नाहीपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीमध्येही मोदी विरुद्ध केजरीवाल असे स्वरूप आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड येथील विधानसभा निवडणुकांत मोदी राज्यस्तरीय नेत्यांशी मुकाबला करत आहेत, असे चित्र दिसू न देण्याची भाजपने काळजी घेतली आहे.