नवी दिल्ली – आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निवडणूक आयोगाने पुन्हा रॅली आणि रोड शोवर बंदी वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ३१ जानेवारीपर्यंत प्रचार रॅली, रोड शोवर बंदी घालण्यात आली आहे. तर डोर टू डोर कॅम्पेनसाठी १० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. याआधी डोर टू डोर कॅम्पेनसाठी ५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
या निर्बंधामध्ये राजकीय पक्षांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. घरोघरी जात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात छोटे मेळावे घेण्यासही सूट दिली आहे. तर व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून डिजिटल प्रचार करण्यासाठी खुल्या मैदानात वाहन उभे करण्यास परवानगी दिली आहे. निवडणुकीच्या प्रचारात काहीसा दिलासा तर काही निर्बंध पाळावे लागणार आहेत.
दरम्यान, उमेदवारांना खुल्या मैदानात बैठक घेण्याला परवानगी आहे. परंतु केवळ ५०० अथवा क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल. लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचे आहे. सर्वांना कोरोनाचे प्रोटोकॉल्स पाळावे लागतील. २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना काही निर्बंधासह प्रचार करता येऊ शकतो. तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना १ फेब्रुवारीपासून प्रचार करण्याची परवानगी आहे.