लखनौ - काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे कौतुक केल्याने उत्तर प्रदेशच्याराजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असेलल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष Omprakash Rajbhar यांनी जिनांबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. जर मोहम्मद अली जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. त्याबाबत ओमप्रकाश राजभर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जर जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही जिनांचे कौतुक केले होते, त्यामुळे त्यांचेही विचार वाचा, असा सल्ला राजभर दिला.
याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे ओमप्रकाश राजभर संतापले, ते म्हणाले की,जिनांशिवाय तुम्ही महागाईवर प्रश्न का विचारत नाही. हे सर्व काही भाजपामुळे होत आहे. भारतीय जनता पक्षामधून हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान हटवा, म्हणजे यांची बोलती बंद होईल. राजभर यांच्या पक्षाने अखिलेश यादव यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील, मात्र आता जागांच्या वाटपाबाबत निर्णय झालेला नाही.