उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आधी फार दिवस शिल्लक राहिलेले नाहीत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणूक होणार असून १० मार्चला निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक असोत, सारेच आपापल्या परीने पूर्ण जोर लावताना दिसत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जनतेशी संवाद साधून आपण पाच वर्षात केलेल्या कामांबद्दल माहिती देत आहेत. तर दुसरीकडे इतर भाजप नेते विविध मार्गांना प्रचार करण्याची तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारासाठी भाजपा नेता मनोज तिवारी एक गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरलही होत आहे.
'मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढने लगा है', असे या गाण्याचे शब्द आहेत. लोकप्रिय गायक जुबिन नोटियाल याच्या 'दिल गलती कर बैठा है' या गाण्याच्या चालीवर मनोज तिवारी यांचं गाणं तयार होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा विचार करूनच हे गाणं तयार केलं जात आहे. या गाण्यात राम मंदिराबरोबरच मथुरा, काशी यासारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केल्याचं बोललं जात आहे.
गाणं अद्याप लाँच झालेलं नाही!
मनोज तिवारी यांचं 'मंदिर अब बनने लगा है' हे गाणं अद्याप लाँच झालेलं नाही. या गाण्यात अयोध्येतील निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराबाबत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी अखिलेश यादव यांनाही सुनावलं आहे. या गाण्यात काशी आणि मथुरामधील भव्य मंदिरांचाही उल्लेख केला आहे. हे गाणं लवकरच लाँच केलं जाईल असं सांगण्यात येत आहे.