UP Assembly Election 2022: ‘लड़की हूं, लड़ सकती हूं'; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचे प्रियंका गांधींच्या सचिवावर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:40 PM2022-01-14T13:40:08+5:302022-01-14T13:44:12+5:30
प्रियंका मौर्य ही काँग्रेसच्या कॅम्पेनमधील प्रमुख पोस्टर गर्ल आहे. लडकी हूँ, लड सकती हू या टॅगलाईनमध्ये प्रियंका मौर्यचा फोटो पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे दिसतो
लखनऊ – आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस यूपीत निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत प्रचार कॅम्पेनमध्ये काँग्रेसनं आधीच बाजी मारली. लडकी हूँ, लड सकती हूँ अशा आशयाची पोस्टर्स यूपीत अनेक ठिकाणी झळकली परंतु आता यावरुन वादंग निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या कॅम्पेन गर्लमधील पोस्टर गर्ल डॉ. प्रियंका मौर्यनं प्रियंका गांधींच्या सचिवावर तिकिटीसाठी पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये तिकिटाचा बाजार चालला आहे. शुक्रवारी या पोस्टर गर्लनं ट्विट करुन म्हटलंय की, लडकी हूँ, लड सकती हूँ पर तिकीट मिळू शकत नाही. कारण मी ओबीसी आहे आणि प्रियंका गांधींचे सचिव संदीप सिंह यांना लाच देऊ शकत नाही. माझ्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा तिने केला आहे.
प्रियंका मौर्य यांनी म्हटलंय की, काँग्रेसमध्ये जातीय राजकारणामुळे आमदार नरेश सैनी यांनी पक्षाला रामराम केला. काँग्रेस पार्टीत सुरु असलेल्या अशा राजकारणाविरोधात कुणीही बोलण्याची हिंमत ठेवत नाही. पैसे न दिल्याने सरोजनीनगर मतदारसंघातून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. कॅम्पेन फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे. लोकं म्हणतील तिकीट मिळालं नाही म्हणून मी बोलतेय असंही त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहे प्रियंका मौर्य?
प्रियंका मौर्य ही काँग्रेसच्या कॅम्पेनमधील प्रमुख पोस्टर गर्ल आहे. लडकी हूँ, लड सकती हू या टॅगलाईनमध्ये प्रियंका मौर्यचा फोटो पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे दिसतो. त्याशिवाय काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातही प्रियंका मौर्यचा फोटो दिसतो. लखनऊच्या सरोजनीनगर विधानसभेच्या जागेवरुन प्रियंका मौर्य या प्रमुख दावेदार होत्या परंतु त्यांच्या जागी रुद्र दमन सिंह यांना तिकीट देण्यात आले.
#लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ पर टिकट नहीं पा सकी क्युकी ओबीसी थी और घुस नही दे सकी। @priyankagandhi जी के संदीप सिंह को। कल सबूत के साथ वीडियो है चैनल पर दिखेगा pic.twitter.com/MqaC8XU2nP
— Dr. Priyanka Maurya (@dpriyankamaurya) January 13, 2022
उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपामधील नाराज नेते आणि योगी सरकारमधील मंत्री, आमदार राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करत आहे. यूपीच्या निवडणुकीत सध्या भाजपाविरुद्ध समाजवादी पक्ष असा सामना थेट पाहायला मिळत आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या तिकीटवाटपावरुन गोंधळ सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. गुरुवारी काँग्रेसने १२५ जागांची उमेदवार यादी घोषित केली. ज्यात ४० टक्के महिलांचा समावेश आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर प्रियंका मौर्यने तिकीट वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.