UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं असून एक सूचक ट्विट केलं आहे. "१० मार्च को इंक़लाब होगा, उत्तर प्रदेश में बदलाव होगा'', असं ट्विट करत अखिलेश यादव यांनी दंड थोपटले आहेत. तसंच या ट्विटसोबत 'बाइस में बाइसिकल' असा हॅशटॅग देखील दिला आहे.
अखिलेश यादव इथवरच थांबले नाहीत. त्यांनी आणखी एक फोट ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेला एक बॅनर काढला जात असतानाचा फोटो अखिलेश यांनी ट्विट केला आहे. यासह "झूठ का पर्दाफाश होगा, अब यूपी में बदलाव होगा", असं ट्विट केलं आहे.
उत्तर प्रदेशात ७ टप्प्यात मतदानउत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.
२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं ३१२ जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मतं मिळाली होती. तर समाजवादी पक्षानं ४७ आणि बहुजन समाज पक्षानं १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागा प्राप्त झाल्या होत्या.