नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका वेळीच होणार की पुढे ढकलल्या जाणार, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निवडणूक आय़ोगाने दिलेल्या संकेतांनुसार कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून नियोजित वेळीच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहे. यासंबंधीची घोषणा ५ जानेवारीला करण्यात येणार आहे.
आत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, बहुतांश राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या वेळीच घेण्याची विनंती केली आहे. तसेच आताच्या घडीला राज्यातील ओमायक्रॉनचे प्रमाणही कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर कमी राजकीय प्रचारसभा आणि वेळीच निवडणुका ह्या कार्यक्रमानुसार उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून होऊ शकतात. पाच जानेवारी रोजी शेवटची सुधारित यादी जाहीर होईल, त्यानंतर ५ जानेवारीनंतर निवडणुकांची घोषणा होईल.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी सर्व व्होटींग बुथवर व्हीव्हीपॅट मशीन बसवल्या जातील. तसेच १ लाख व्होटिंग बुथवर लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा दिली जाणार आहे. तसेच मतदानावेळी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या येवेळेत मतदान होईल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मतदानाची वेळ एका तासाने वाढवली आहे, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.