नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज झाली आहे. एकूण सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून, १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामध्ये होत असलेल्या या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अत्यंत सक्त नियमावली लागू केली आहे. मात्र कोरोनाबाधित मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाने खास व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा कोरोनाकाळातील निवडणुकांबाबत म्हणाले की, कोरोनाकाळात सुरक्षितपणे निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. वेळेत निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी असून, कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या निवडणुका घेतल्या जातील. प्रत्येक बुथवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. तसेच कोरोनाबाधिकांना मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
या निवडणुकीमध्ये शासकीय कर्मचारी आणि सैनिकांबरोबरच ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना आणि कोविड बाधितांना मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. याशिवाय दिव्यांग व्यक्तींनाही पोस्ट बॅलेटची सुविधा उपलब्ध असेल, असं निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये कोरानाबाधित मतदारांसाठीही निवडणूक आयोगानं विशेष व्यवस्था केली आहे. कोविडबाधित किंवा संशयित व्यक्तींच्या घरी निवडणूक आयोगाची व्हिडीओ टीम विशेष व्हॅननं जाईल. तसेच त्यांनाही यावेळी मतदान करता येईल. त्यांना मतपत्रिकेच्या मदतीनं मतदान करण्याचा अधिकार मिळेल, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे.
तसेच कोरोनामुळे पाचही राज्यातील मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती माहिती द्यावी लागणार आहे. तसेच १५ जानेवारीपर्यंत कुठल्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याबाबत पुढील निर्णय नंतर घेण्यात येईल, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.