नवी दिल्ली : गोवा व उत्तराखंडमधील सर्व जागा तसेच उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याकरिता उद्या, सोमवारी मतदान होणार आहे. गोवा, उत्तराखंडची विधानसभा निवडणूक प्रक्रिया एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशमधील ९ जिल्ह्यांतल्या ५५ जागांकरिता उद्या, सोमवारी मतदान होईल. त्याकरिता ५८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुमारे २ कोटी मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला पार पडले होते. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. या राज्यात निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. योगी आदित्यनाथ यांना सत्ता कायम राखायची आहे, तर समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष व अन्य विरोधी पक्षांनी आपापल्या परीने भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे.
पंजाब : २० फेब्रुवारीला मतदानपंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. याआधी मतदानासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. संत रविदास यांची १६ फेब्रुवारीला जयंती असल्याने निवडणूक आयोगाने पंजाबमधील मतदानाचा दिवस बदलला.
गोवा व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया एकाच टप्प्यात उद्या, सोमवारी पूर्ण होणार आहे. गोव्यात सर्व ४० जागांसाठी ३३२ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ११ लाख मतदार या उमेदवारांचा फैसला करणार आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. त्याकरिता ६३२ उमेदवार लढत देत आहेत.
मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी व ३ मार्च अशा दोन टप्प्यांत मतदान होईल. पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया १० फेब्रुवारीला सुरू झाली ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे. या निवडणुकांचा निकाल १० मार्चला जाहीर होईल.