Assembly Election 2022: चार राज्यांत आम्हीच जिंकणार, उत्तर प्रदेशात आमच्या पाठिंब्याविना सरकार नाही बनणार, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:49 PM2022-01-08T18:49:20+5:302022-01-08T18:51:42+5:30
Assembly Election 2022: चार राज्यांत आम्हीच सरकार स्थापन करणार असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार बनणार नाही असा दावा, Congressचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार पाच राज्यांमध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. दरम्यान, निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने दंड ठोपटले आहेत. चार राज्यांत आम्हीच सरकार स्थापन करणार असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार बनणार नाही असा दावा, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत. तसेच प्रियंका गांधींनी घेतलेल्या मेहनतीनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होणार नाही.
यावेळी सुरजेवाला यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या नेतृत्वाबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी हे आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. तसेच पक्षाच्या संघटनेचे प्रमुख म्हणून नवज्योतसिंग सिद्धू हे आमचा चेहरा आहेत. हे १ आणि १ मिळून ११ होतात. तर प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सुनील जाखड हे आमचा चेहरा आहेत. हे तिघे मिळून, १११ होतात.
आज ज्या पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यापैकी पंजाबमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. तर गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मात्र काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.