Assembly Election 2023: येत्या नोव्होंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. एकीकडे भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला आपला एकही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. रिपोर्टनुसार, राजस्थानमधील सर्वेक्षणावरुन काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी यांच्या टीममधील वादामुळे उमेदवारांची यादी रखडली आहे.
काँग्रेसने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची यादी येईल, असे जाहीर केले होते. पण, सप्टेंबर सोडा, आता ऑक्टोबरचा एक तृतीयांश कालावधी उलटून गेला तरी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले नाहीत. निवडणुकीच्या तयारीबाबत राहुल गांधी सतत बैठका घेत आहेत. दुसरीकडे भाजपने एकापाठोपाठ उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने पक्षातील बडे नेते आणि खासदारही रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या रणनीतीमुळे बॅकफूटवर आलेली काँग्रेस अजूनही विचारात आहे. मात्र, लवकरच नावे जाहीर होतील, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने उमेदवारांची निवड करण्यासाठी राज्य निवडणूक समिती आणि स्क्रीनिंग समितीची बैठक घेतली. मध्यंतरी निवडणूक समितीची बैठक खासदारांसाठी झाली, पण सर्वात मोठी अडचण राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमधील राहुल गांधींचे विशेष निवडणूक रणनीतीकार सुनील कोनुगोलू यांनी 50 टक्के विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांची टीम त्यांच्या समर्थक आमदारांची तिकिटे न कापण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये एकमत होत नाही. यामुळेच राज्य निवडणूक समितीची किंवा स्क्रिनिंग समितीची पुढची बैठक झाली नाही. अशा स्थितीत भाजपविरोधात मोठा लढा लढण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुठे आणि कधी निवडणुका?निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील 679 विधानसभा जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व राज्यांतील मतमोजणी 3 डिसेंबरला होईल.