नवी दिल्ली : सध्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतचे एक्झिट पोल देशभर चर्चेचे केंद्र बनले आहेत. प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे. मात्र, एक्झिट पोल कितपत अचूक ठरतात, हे 3 डिसेंबरलाच कळेल, मात्र सध्या याबाबत राजकीय चर्चा रंगत आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला एक्झिट पोलशी संबंधित काही माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसेल. तर जगातील पहिल्या एक्झिट पोलबद्दल सांगणार आहोत.
जगातील पहिला एक्झिट पोल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये 1936 मध्ये घेण्यात आला. रिपोर्टनुसार, त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्कमध्ये निवडणूक सर्वेक्षण केले होते. यामध्ये मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर आलेल्या लोकांना त्यांनी कोणत्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान केले, अशी विचारणा करण्यात आली होती.
सर्वेक्षणादरम्यान मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून फ्रँकलिन डी. रुझवेल्ट निवडणूक जिंकतील असा अंदाज बांधण्यात आला. हा पहिला एक्झिट पोल पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले आणि फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी निवडणूक जिंकली. यानंतर एक्झिट पोल इतर देशांमध्येही लोकप्रिय झाला. यानंतर 1937 मध्ये ब्रिटनमध्येही पहिला एक्झिट पोल घेण्यात आला. तर 1938 मध्ये फ्रान्समध्ये पहिला एक्झिट पोल घेण्यात आला होता.
भारतात पहिला एक्झिट पोल कधी घेतला?भारतातील पहिला एक्झिट पोल 1996 मध्ये घेण्यात आला होता. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) ने हा एक्झिट पोल घेतला होता. या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणूक जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकाल अगदी एक्झिट पोलप्रमाणे आले. मात्र, एक्झिट पोलमुळे निवडणुकीच्या निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर भारतात सुद्धा एक्झिट पोलचा कल वाढला आहे.