नवी दिल्ली - नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटीत पुन्हा एकदा फूट पडल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, भाजपविरोधी (BJP) आणि काँग्रेसविरोधी (Congress) आघाडी स्थापन करण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता काँग्रेसनेही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
वेड्या माणसाला उत्तर देणे योग्य नाही - काँग्रेसममता बॅनर्जी यांच्या आरोपांना काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury ) यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधत त्यांना 'वेडे' म्हणून संबोधले आहे. चौधरी म्हणाले, "वेड्याला उत्तर देणे योग्य नाही, काँग्रेसचे संपूर्ण भारतात 700 आमदार आहेत. दीदींच्या जवळ आहेत का? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. त्यांच्याकडे आहे का?
'भाजपच्या एजंट म्हणून करत आहेत काम' -अधीर रंजन चौधरी म्हणाले, काँग्रेस नसती तर त्यांच्यासारखे नेते झाले नसते. ममता बॅनर्जी भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी त्या असे बोलत असतात. हे त्यांनी लक्षात ठेवावे, की भाजपला खूश करण्यासाठीच त्या गोव्यात गेल्या, त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. दीदींनी गोव्यात काँग्रेस कमकुवत केली, हे सर्वांना माहीत आहे.
'काँग्रेसमध्ये आता ती गोष्ट नाही...' -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेसविरोधात वक्तव्य केले होते. भाजप विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीवर भर देत, त्यांनी प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधला. एवढेच नाही, तर काँग्रेसची वाट पाहण्यात अर्थ नाही, कारण आता त्यांच्यात ती गोष्ट राहिली नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.