Assembly Election Result 2022: काँग्रेसची पंजाबमध्ये उडाली दांडी, उत्तर प्रदेश, गोव्यातही घसरगुंडी... जाणून घ्या किती जागा घटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:28 PM2022-03-10T13:28:14+5:302022-03-10T13:31:43+5:30
Assembly Election Result 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेससाठी कमालीचे निराशाजनक ठरले आहेत. सत्ता असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसचा आम आदमी पक्षाकडून दारुण पराभव झाला आहे. तर सत्ता येण्याची अपेक्षा असलेल्या उत्तराखंड आणि गोव्यामध्येही काँग्रेसच्या हाती निराशा हाती लागली आहे.
नवी दिल्ली - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेससाठी कमालीचे निराशाजनक ठरले आहेत. सत्ता असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसचा आम आदमी पक्षाकडून दारुण पराभव झाला आहे. तर सत्ता येण्याची अपेक्षा असलेल्या उत्तराखंड आणि गोव्यामध्येही काँग्रेसच्या हाती निराशा हाती लागली आहे. आधीच किरकोळ अस्तित्व असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींच्या जोरदार प्रचारानंतरही काँग्रेसची कामगिरी २०१७मधील कामगिरीपेक्षा अधिक निराशाजनक झाली आहे.
आतापर्यंतच्या निकालांनुसार काँग्रेसला सर्वाधिक फटका हा पंजाबमध्ये बसला आहे. पंजाबमध्ये २०१७ मध्ये काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. मात्र अंतर्गत मतभेद आणि आपच्या लाटेमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला असून, काँग्रेसला आताच्या कलांनुसार केवळ १७ जागांवर आघाडी मिळालेली आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पंजाबमध्ये पराभूत होण्याच्या मार्गावर आहेत.
तर उत्तराखंडमध्येही सत्ताविरोधी लाटेचा फायदा काँग्रेसला घेता आलेला नाही. येथेही भाजपाने बहुमताच्या पुढे मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस केवळ २३ जागांवर आघाडीवर आहे. २०१७ च्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर राहिला आहे.
तर गोव्यामध्येही काँग्रेसचा अपेक्षाभंग झाला आहे. २०१७ मध्ये १७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला केवळ ११ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर गोवा फॉरवर्ड पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. येथे विरोधी पक्षांतील मतविभाजनामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे. मणिपूरमध्येही काँग्रेसला अधिकृत आकडेवारीनुसार केवळ ३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र त्याचा फायदा पक्षाला होताना दिसलेला नाही. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी केवळ २ जागांवर काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे.