नवी दिल्ली - आज लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने पुन्हा प्रचंड बहुमत मिळाले आहे. आतापर्यंतचे निकाल आणि कलांनुसार भाजपा २५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपाने सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात जंगी विजयोत्सवर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशमधील निकालांमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला. तसेच २०२४ च्या निकालांबाबतही सूचक विधान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही विजयी झालो तेव्हा काही राजकीय पंडितांनी म्हटलं होतं की, या २०१९ च्या भाजपाच्या विजयात विशेष काय आहे. भाजपाचा विजय २०१७ मध्येच निश्चित झाला होता. आता ते सांगतील. आता यावेळीही हे पंडित जरूर म्हणण्याची हिंमत करतील की, २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालांनी २०२४ चे निकाल निश्चित केले आहेत, असं मी मानतो.
दरम्यान, भाजपाच्या विजयानंतर भाजपाच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय या घोषणांनी केली. तसेच या निवडणुकीतून पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत भाग घेणाऱ्या मतदारांचे मोदींनी आभार मानले. तसेच यावेळी होळी १० मार्चपासून सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा निवडून येण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये ३७ वर्षांनंतर कुठलेही सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे, अशा शब्दात मोदींनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.