गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (८ डिसेंबर) जाहीर होत आहेत. या निवडणूक निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही दिसून येईल. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीसाठी हे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कारण आज आम आदी पक्ष हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू शकतो. आपला दिल्ली, पंजाब आणि गोव्यात यापूर्वीच राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. सध्या AAP राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यापासून केवळ एक राज्यच दूर आहे.
काय सांगतो नियम? - एक राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळविण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला किमान चार राज्यांमध्ये मान्यता मिळणे आवश्यक आहे. राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षाला राज्यात किमान दोन जागा जिंकणे आणि विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळविणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत दोन जागा जिंकणे आणि किमान 6 टक्के मते मिळविणे आवश्यक आहे.
आपला गुजरातकडून अधिक अपेक्षा - आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशपेक्षा गुजरातकडून अधिक अपेक्षा आहेत. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्यासाठी, AAP ने सर्वच्या सर्व 182 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांनी आक्रमक प्रचार करून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना आपणच आव्हान देऊ शकतो असे चित्र निर्माण केले होते.