- संजय शर्मानवी दिल्ली - मतदान आटोपल्यानंतर आता पाच राज्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये कोणत्याही स्थितीत भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी राज्यांतील नेत्यांसमवेत रणनीती तयार करून दोन्ही शक्यतांसाठी प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार केला आहे.
एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या नेत्यांशी चर्चा करून निवडणूक निकालानंतरची रणनीती तयार केली.
मध्य प्रदेश व राजस्थानमध्येही भाजपने स्पष्ट बहुमतात सरकार बनविण्याची व अन्य स्थितीसाठीही तयारी सुरू केली आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यास प्लॅन ए आणि न मिळाल्यास प्लॅन बी तयार असेल. काही एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काट्याची टक्कर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, निकालात काट्याची टक्कर पुढे आल्यास मध्य प्रदेश व राजस्थानच्या आमदारांना सरकार स्थापन होईपर्यंत आसाम व गुजरातमध्ये पाठवण्याची तयारीही करण्यात आली आहे.
कोण होणार राजस्थानमध्ये मुख्यमंत्री? - एक्झिट पोलनुसार निवडणुकीचे निकाल आल्यास भाजपसमोरील सर्वांत मोठे आव्हान मुख्यमंत्री निश्चित करण्याचे असेल. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राजकुमारी दिया कुमारी यांच्यासारखी मोठी नावे आहेत. - राजस्थानमध्ये भाजपचे सरकार किरकोळ बहुमताने स्थापन झाल्यास ते सरकार चालवण्यासाठी व वाचविण्यासाठी भाजपला पुन्हा अनुभवी नेत्या वसुंधरा राजे यांची गरज भासणार आहे. - भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षश्रेष्ठी कोणालाही मुख्यमंत्री करू शकतात. महाराष्ट्राप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजप घेऊ शकते.
या नेत्यांवर जबाबदारी- आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा व गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना यासाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - दोन्ही राज्यांत जिंकू शकणारे अपक्ष आमदार व असंतुष्ट काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. - मध्य प्रदेशात असंतुष्ट काँग्रेस नेते व जिंकू शकणाऱ्या अपक्ष आमदारांची यादी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
या नाराज नेत्यांवर भाजपची नजर- मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये तर आमचे सरकार येणार आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे सरकार येईल. - छत्तीसगडमध्ये अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन टी. एस. सिंहदेव यांना दिले होते. ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बाेलले जाते.- अशाच प्रकारे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आणखी एक विरोधक, माजी केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांच्यावर भाजपची नजर आहे.