Assembly Election Result 2023: आजचा दिवस भाजपसाठी खूप खास आहे. पक्षाने स्वबळावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता काबीज केली आहे. MP मध्ये भाजपची आधीपासून सत्ता होती, तर पक्षाने राजस्थान आणि छत्तीसगडमधून काँग्रेसला हद्दपार केले आहे. या पराभवानंतर काँग्रेसची राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
संबंधित बातमी- 'तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!' भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी तेलंगणात पक्षाच्या बंपर विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारला. खर्गे म्हणाले की, "काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल मी तेलंगणातील मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आम्हाला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मतदान केले, त्या सर्वांचेही आभार मानतो. हे निवडणूक निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, पण आम्हाला खात्री आहे की, आम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने परत येऊ.”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने या चार राज्यांच्या निवडणुकीत पूर्ण उत्साहाने भाग घेतला होता. मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. या पराभवाने खचून न जाता 'INDIA' आघाडीतील पक्षांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू," अशी प्रतिक्रिया खर्गेंनी दिली.
संबंधित बातमी- भाजपाची 'पॉवर' वाढली; आता १२ राज्यांमध्ये 'आत्मनिर्भर' सत्ता, काँग्रेसकडे उरली ३ राज्यं